सराफ व्यावसायिकाचे रहस्यमय बेपत्ता होणे, १२ दिवसांनंतरही पोलिसांना सुगावा नाही!
बेपत्ता सराफ सुशांतचा शोध सुरू, पोलिसांकडून आशा
लाल दिवा-नाशिक,दि.८:-नाशिक रोड (प्रतिनिधी) – नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील २७ वर्षीय सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे यांचे गेल्या १२ दिवसांपासून रहस्यमय बेपत्ता होणे हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असली, तरी अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. यामुळे कुटुंबीयांसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुशांतचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
२७ ऑक्टोबर रोजी सुशांत आपल्या वडिलांसोबत जाखोरी येथील शेतावर गेले होते. तिथे काही वेळ घालवल्यानंतर सुशांत हे “पाणी आणि खाण्याचे आणतो” असे सांगून आपल्या अॅक्टिवावरून निघून गेले आणि त्यानंतर ते परतलेच नाहीत. काही वेळाने वडिलांनी फोन केला असता, सुशांतने “मी गावातच आहे, येतोय” असे सांगितले आणि फोन बंद केला. हे त्यांचे शेवटचे बोलणे ठरले.
त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी सुशांतची दुचाकी चांदवड बस स्थानकाजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली. यामुळे कुटुंबीयांची चिंता आणखीनच वाढली. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.
नाशिक शहर, नाशिक रोड, ग्रामीण भाग, मनमाड, चांदवड, मालेगावसह राज्याच्या विविध भागात आणि परराज्यातही सुशांतचा शोध घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुशांतचे अपहरण झाले आहे का? त्याच्यासोबत काही अनर्थ घडला आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस तपास करत असले तरी, अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुशांतचा शोध घेण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सुशांतला शोधण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज आहे.