वृद्ध दाम्पत्याची हत्या: काळजाचा ठोका चुकवणारा भाऊबीजेचा खून! सख्ख्या भावानेच उचलली कुऱ्हाड!
४८ तासांची श्वास रोखणारी शोधमोहीम! अखेर राजू सुर्वे यांनी उलगडला दुहेरी खुनाचा गुंता
लाल दिवा-नाशिक,दि.८ :-दिवाळीच्या आनंदाला काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली. साडगाव शिवारात राहणाऱ्या रामू राधो पारधी (७०) आणि त्यांची पत्नी चंद्रभागा रामू पारधी (६५) या वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. भाऊबीजेच्या पवित्र दिवशीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोघांनाही त्यांच्याच घरात टणक हत्याराने डोक्यात, छातीत आणि बरगडीत असे प्राणघातक वार करून ठार मारण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हा खून कोणी केला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक सुर्वे हे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी आणि चौकस वृत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली, पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांच्या माहितीवरून तपासाला वेग दिला.
अखेर ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना यश आले. आश्चर्य म्हणजे आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मयत चंद्रभागा पारधी यांचा सख्खा भाऊ सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५०, रा. लाडची शिवार) असल्याचे निष्पन्न झाले. जमिनीच्या वादातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. भाऊबीजेच्या दिवशीच भावाने बहिणीचा आणि मेहुण्याचा जीव घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा छडा लावून दाखवून दिली की कायद्याचे हात लांब असतात. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.