पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम वाटप करावी…दिव्यांग कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी :-पालकमंत्री दादाजी भुसे..!
लाल दिवा-नाशिक,ता.२२: अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल. तसेच दिव्यांगांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना, दिव्यांग निधी खर्चाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, नाशिक महानगरपालिका अपर आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एफ. बी. मुलाणी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महावेध हवामान केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक राहुल व्यास, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, ओरिएंटल पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दिक्षीत, जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे सदस्य शेतकरी भाऊसाहेब जाधव, अजित खर्जुल, शांताराम वंजारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना निकषानुसार लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांनी शाखानिहाय या योजनेचा लाभ आवश्यक त्यासर्व शेतकरी लाभार्थ्यांना होईल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. तसेच लीड बँकेने सर्व बँकांना सूचित करावे की, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही इतर कोणत्याही कारणास्तव वळती करू नये. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील साधारण 5 लाख 88 हजार 648 शेतकरी सहभागी झाले असून यातील आतापर्यंत पिक विमा कंपनीने 57 कोटी 46 लाखंची विमा रक्कम वाटप केली आहे. यातील उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर विमा रकमेचे वाटप करण्यात यावे. तसेच सोयाबीन, मका व बाजरी या पिकांसोबतच कापूस पिकाचा समावेश करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका यांना एकूण निधीच्या 5 टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यावर खर्च करण्यात यावा. जेणे करून दिव्यांग व्यक्तिंना आर्थिक पाठबळ मिळून त्या स्वत:च्या पायावर आत्मनिर्भरपणे उभे राहू शकतील. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच शहारात तयार होणारे दिव्यांग भवन लवकरात लवकर तयार करून दिव्यांग भवानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळण्यास मदत होईल. दिव्यांगांच्या पुर्नवसनाकरिता सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.
- दिव्यांग निधी खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी दिव्यांग निधी खर्चाबाबत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत nashikdivyang.in या ॲपची निर्मीती केली आहे. या ॲपद्वारे कार्यालय अथवा संबंधित दिव्यांग व्यक्ती देखील लॉगइन करून माहिती भरू शकते. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी माहिती दिली