महाराष्ट्रातील उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी बंधनकारक
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाचे नवे निर्देश: उमेदवारांना आता गुन्हेगारी माहिती लपवता येणार नाही
नाशिक, १२ (लाल दिवा): येत्या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या सर्व उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना आता त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाने हे नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार उमेदवारांना त्यांच्यावर असलेल्या प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाला सांगावी लागणार आहे. तसेच ही माहिती वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पक्षाच्या वेबसाइटवर देखील प्रसिद्ध करावी लागणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती देण्यासाठी एक शपथपत्र तयार केले असून, त्यात माहिती स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे. उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी ही माहिती पक्षाला देखील द्यावी लागेल आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
- प्रसिद्धी तीन वेळा बंधनकारक:
गुन्हेगारी पार्श्वभूमीची ही माहिती उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी निवडणूक कालावधीत तीन वेळा जाहीर करणे बंधनकारक असेल. पहिली प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपासून चार दिवसांच्या आत करावी लागेल. दुसरी प्रसिद्धी पुढील पाच ते आठ दिवसांत आणि तिसरी प्रसिद्धी ९ व्या दिवसापासून ते प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत करावी लागेल.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ‘नो योर कॅंडिडेट’ या लिंकवर देखील ही माहिती उपलब्ध असेल. निवडणूक आयोगाने सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.