राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले त्वरीत सादर करावे… महेश बच्छाव..
लाल दिवा-नाशिक दिनांक: 31ऑक्टोबर 2023 जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या जिल्ह्यातील निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरीत नजीकच्या उप कोषागार व कोषागार कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांच्यासाठी जीवन प्रमाण प्रणाली, बँकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमोर नोंदवहीत स्वाक्षरी करणे किंवा विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयास सादर करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्या तीन पर्यायांपैकी एका पर्यायाचा वापर करून निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केलेली आहे, त्यांना डिसेंबर 2023 चे निवृत्तीवेतन किंवा कुटूंबनिवृत्तीवेतन अदा होणार आहे. तथापि ज्या निवृत्तीधारकांनी अद्यापही हयातीच्या प्रमाणपत्राबाबत वरील तीन पर्यायांपैकी एकाही पर्यायाचा वापर केला नसल्यास त्यांना हयातीच्या प्रमाणपत्राअभावी डिसेंबर 2023 पासून निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नसल्याचेही जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव यांनी कळविले आहे.
सर्व निवृत्तीवेतनधाकांनी संबंधित बँक शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जावून जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या हयातीच्या दाखल्याच्या यादीमध्ये सही करावी अथवा जीवन प्रणालीद्वारे तयार होणारे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात अथवा नजीकच्या उपकोषागार कार्यालयात जमा करावयाचे आहे.