विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर ‘खंडणी’चा डाव, ‘सामाजिक’ संघटनेच्या मुखपट्यात लपलेले ‘गिधाडे’ जेरबंद!
सामाजिक संघटनेच्या नावाखाली २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक
लाल दिवा-औरंगाबाद,दि.१४ :- गरुड झेप अकादमीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा गैरफायदा घेत, काही जणांनी सामाजिक संघटनेच्या नावाखाली २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी शहरातील एका क्लासमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नेमके काय घडले?
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात निलेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गरुड झेप अकादमीत काही महिन्यांपूर्वी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. या घटनेचा गैरफायदा घेत, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड आणि रेखा वाहटुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे यांनी सोनवणे यांना धमक्या देण्यास सुरुवात केली.
आरोपींनी सोनवणे यांना सांगितले की, ते त्यांच्या संघटना आणि पक्षाच्या नावाने पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्यासह विविध कार्यालयात तक्रारी करतील आणि त्यांची अकादमी बंद पाडतील. तसेच, हे सर्व टाळायचे असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली.
सुरुवातीला सोनवणे यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी त्यांचे ऐकून घेतले नाही. अखेर सोनवणे हे पैसे देण्यास तयार झाले आणि त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे हे आरोपींना भेटले आणि त्यांना दोन लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. यावेळी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले.
याशिवाय, आरोपींनी शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका शैक्षणिक क्लासमध्ये देखील तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणीही धमक्या देत असेल किंवा खंडणी मागत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.