खंडणीसाठी कंपनी मालकांना पिस्तुलाचा धाक, 60 लाखांची मागणी; नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !
पिस्तुलाच्या सावलीत व्यवसाय! नाशिकमध्ये खंडणीकरांचा धुमाकूळ, कंपनी मालकाचे धाबे दणाणले
लाल दिवा-नाशिक,दि.१४ – शहरातील शिंदेगाव परिसरात एका कंपनी मालकाला धमकी देऊन तब्बल 60 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही घटना दोन महिन्यांपूर्वीची असून, फिर्यादीच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.13 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदू रामदास मोरे (वय 36, रा. चिंचोळी बुद्रुक, ता. येवला, जि. नाशिक, सध्या रा. प्लॉट क्र. डी, सुपा एमआयडीसी, पारनेर, जि. अहमदनगर) यांच्यासोबत ही घटना घडली आहे. गेल्या 9 जुलै रोजी रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान शिंदेगाव येथील गट क्रमांक 468 मधील फिर्यादींच्या कंपनीत ही घटना घडली. फिर्यादी आणि त्यांचे भागीदार संपत सोनवणे यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. त्याच वादाच्या निमित्ताने सचिन नवनाथ आहेर आणि सुनिल खोकले (दोघांचाही पत्ता अज्ञात) हे दोघे कंपनीत आले.
आरोपी सचिन आहेर याने फिर्यादींना पिस्तुलाचा धाक दाखवत 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास फिर्यादींसह त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. “तुझी कंपनी बंद कर, नाहीतर कशी बंद करायची ते मला माहित आहे!”, असा इशाराही आरोपींनी दिला. तसेच आरोपींनी त्यांचे मित्र विजय आणि सर्जेराव सोनवणे यांचा उल्लेख करीत, ते जरी व्यवसायात भागीदार नसले तरी त्यांनाही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. कंपनी विकून पैसे देण्याची धमकीही त्यांनी दिली.
फिर्यादींनी याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन नवनाथ आहेर आणि सुनिल खोकले यांच्या विरोधात भादंवि कलम 385, 34 आणि शस्त्र अधिनियम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि किरण कोरडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.