ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी …. पाणी पुरवठा, बांधकाम विभागात समन्वय घडवा….. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी …!
लाल दिवा-नाशिक,ता.१६ : गॅस पाईपलाईनच्या कामामुळे फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती व्यवस्थित न केल्याने प्रभाग क्रमांक २४ मध्ये दररोज पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत. संबंधित पाणी पुरवठा आणि बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. ही स्थिती कायम राहिली तर ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही विभागात समन्वय घडवून कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये गॅस पाईपलाईनच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्या होत्या. त्या पूर्णपणे व व्यवस्थित दुरुस्त केलेल्या नाहीत. यामुळे संबंधित ठिकाणी वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असून, पाणी वाया जात आहे. गॅस लाईनमुळे हे प्रकार होत असून, ते काम बांधकामशी संबंधित आहे, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जाते. एक वेळ दुरुस्ती केल्यानंतर पुढची जबाबदारी ही पाणी पुरवठा विभागाची आहे, असे बांधकामकडून स्पष्ट केले जाते. यामुळे दुरुस्तीला वेळ जातो, पाणी वाया जाते, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दुरुस्ती ही जुजबी केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचलेले असते, त्याचवेळी जलवाहिनी फुटली तर तिचा शोध घेणे व दुरुस्त करणे अवघड होईल, वेळही जाईल. परिणामी, ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण होईल. हे टाळण्यासाठी या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, त्यासाठी संबंधित दोन विभागाचा समन्वय घडवून आणून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, अशोक पाटील, दीपक दुट्टे आदींनी केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना मंगळवारी, १३ जून रोजी निवेदन दिले आहे. दोन्ही विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून सूचना देतो, असे चौधरी यांनी सांगितले.