१० कर्तृत्ववान महिलांना ‘शारदाई पुरस्कार’ प्रदान !
लाल दिवा, ता. ३० : रवींद्र मालुंजकर, गिरीश पालवे, प्रथमेश पाठक या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सिक्युरिटी प्रेसच्या जिमखाना येथील सभागृहात शनिवार दि. २९ एप्रिल रोजी १० कर्तृत्ववान महिलांना ‘शारदाई पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
पुस्तकांच्या आजी भीमाबाई जोंधळे, मतिमंद आणि अॉटिस्टिक मुलांसाठी काम करणाऱ्या मनिषा जुनागडे, पल्लवी कुलकर्णी, आशा पाटील, सुरेखा मैड, नीता गोडसे, मंजिरी पालवे-भाबड, भक्ती गोडसे, योगीता ढोकणे, भाग्यश्री देशपांडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेजस्विनी यांनी स्वागतगीत सादर केले. संतोष गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या दिवंगत अध्यक्षा शारदा गायकवाड व दिवंगत उपाध्यक्ष किशोर पाठक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षा जयश्री जांभळे यांनी कार्यक्रमाची संकल्पना समजावून सांगितली. संस्थेचे खजिनदार राजेंद्र चिंतावार व जनसंपर्क संचालक प्रशांत कापसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षा जयश्री जांभळे व जालिंदर गायकवाड यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. सदस्या सविता पोतदार यांच्या निर्देशानुसार वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील निवडक कविता सादर करण्यात आल्या . सांस्कृतिक सचिव नंदकिशोर ठोंबरे यांनी काव्यवाचन स्पर्धेची संकल्पना सांगितली. त्यानंतर प्रथमेश पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुरस्कारार्थींचा परिचय संस्थेच्या सचिव अल्का कोठावदे व सहसचिव रचना चिंतावार यांनी करून दिला. त्यानंतर मनिषा जुनागडे यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व प्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. त्यानंतर काव्यवाचन स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण करण्यात आले. ( पारितोषिक विजेत्यांची नावे) . भावना विसपुते यांच्या सुत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. पसायदानाने या सुंदर सोहळ्याची सांगता झाली. विलास गोडसे,अविनाश विसपुते आदि सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.