प्लास्टिकला ‘ना’ म्हणा, ‘हरित’ गणेशोत्सव साजरा करा: नाशिक पोलीसांचे आवाहन !
लाल दिवा-नाशिक: नाशिककरांसाठीचा सर्वात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सव. यंदा हा सण ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोनिका राऊत नाशिक पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र २ ने शहरात गणेशोत्सव शांततामय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी विशेष नियोजन केले आहे.
- उत्कृष्ट मंडळांना पारितोषिक:
यावर्षी उत्कृष्ट सजावट, सामाजिक संदेश आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस दलाकडून विशेष पारितोषिक देण्यात येणार आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासह दोन उत्तेजनार्थ अशा एकूण पाच पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय वाहतूक नियोजन, विद्युत सुरक्षा आणि जलसाठवण या बाबींना प्राधान्य देणाऱ्या मंडळांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
- पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना:
नाशिक पोलीसांनी यंदा गणेशोत्सवात पर्यावरणाचा विचार व्हावा यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत, शाडूंची लागवड, प्लास्टिकचा वापर टाळणे, जलसाठवण, आवाज प्रदूषण कमी करणे, रक्तदान शिबीर अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच मंडळांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
- निवड प्रक्रिया:
पारितोषिकासाठीच्या निवडीसाठी पोलीस अधिकारी, महानगरपालिका प्रतिनिधी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाक्षेत्रातील तज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व गणेश मंडळांच्या कामकाजाचे मूल्यांकन करून निष्पक्षपणे पारितोषिक विजेत्यांची घोषणा करेल.
समिती सदस्य:
- 1. श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग
- 2. डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग
- 3. श्री. अनिल निकम, उपायुक्त (जाहिरात), नाशिक महानगरपालिका
- 4. श्री. बाळकृष्ण चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी
- 5. श्री. सुनिल कारसटे, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा
- 6. श्री. कैलास मोरे, सेवानिवृत्त प्राचार्य
- 7. श्री. जगदीश ढेंगे, कला शिक्षक
- 8. श्री. निशिकांत पाटील, पत्रकार
- नागरिकांना आवाहन:
मोनिका राऊत पोलीस उपायुक्त, परिक्षेत्र २ यांनी सर्व गणेश मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनीही गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करावा तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती ताबडतोब पोलिसांना द्यावी असे आवाहन केले आहे.
नाशिक पोलीस दलाच्या या विशेष उपक्रमामुळे यंदाचा गणेशोत्सव निश्चितच आनंददायी आणि पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.