जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळ्यात – भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी..!
रिक्षातून आले, लुटले, पळाले… पण पोलिसांच्या तावडीतून सुटणार कोण?
लाल दिवा-नाशिक,दि.९:- (प्रतिनिधी) – निफाड येथील एका नागरिकाला हॉस्पिटलबाहेर चहा पिण्यासाठी पडलेला ‘पंच’ चांगलाच महागात पडला. रिक्षातून आलेल्या तीन चोरट्यांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून पळ काढला. मात्र भद्रकाली पोलिसांनी कौशल्याने केलेल्या तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला असून, एका आरोपीसह दोन बाल अपराध्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्री. गणेश डांगळे हे निफाड येथील संदर्भ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आले होते. उपचारानंतर बाहेर पडून ते चहा घेण्यासाठी जात असतानाच त्यांच्याजवळ रिक्षा आली. त्यातील एकाने डांगळे यांना झटकून धरले आणि इतरांनी त्यांच्या खिशातील ३००० रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक (प्रशासन) विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
सपोनि सत्यवान पवार, सपोनि चंद्रकांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढला. अखेर अस्लम लतीफ खान (वय २१, रा. फकिरवाडी, नाशिक) याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन बाल अपराध्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि सपकाळे करीत आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.