रक्ताने माखलेला इंदिरानगर: एका तीस वर्षीय युवकाची निर्घृण हत्या
योगेश बत्तासे यांची हत्या: पोलिसांचा तपास सुरू
लाल दिवा-नाशिक,दि.९:-इंदिरानगर (प्रतिनिधी)- इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील कचरा डेपो समोरील सूनसान जागी शुक्रवारी मध्यरात्री एका तीस वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव योगेश बत्तासे, नांदगाव असे आहे. घटनेची माहिती मिळताच साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
शहराच्या मध्यवर्ती भागात, पोलीस ठाण्याच्या जवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश बत्तासे यांच्या हत्नेयेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून पुरावे जमा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
योगेश बत्तासे यांच्या हत्येमागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, परिसरातील गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासला जात आहे. हत्येचे गूढ लवकरात लवकर उलगडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.