रक्ताने माखलेला अमृतधाम: पोलीस यंत्रणा कुंभकर्णाच्या झोपेत?
पोलीस कुठे आहेत? अमृतधामात दहशतीचे सावट
लाल दिवा-नाशिक,२५:-अमृतधाम! नावातच अमृत असलेल्या या परिसरात आज रक्ताचे डाग उमटले आहेत. विडी कामगार नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये या तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडला, असे सांगितले जात आहे, पण किरकोळ वादातून एखाद्याचा जीव घेण्याची हिंमत कुठून येते? ही हिंमत देणारे कोण? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता अत्यावश्यक झाले आहे.
मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या विशांतवर अचानक हल्ला झाला. या हल्ल्याची क्रूरता अंगावर शहारे आणणारी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचे गस्त वाढवण्याचे दावे केवळ कागदावरच राहिले आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हा केवळ एका खुनाचा प्रकार नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक आहे. या घटनेनंतर अनेकांची घरे फोडण्यात आली, गाड्यांची तोडफोड करण्यात आली, अगदी रिक्षा जाळण्याची हिंमतही गुंडांनी दाखवली. या दहशतवादाच्या राज्यात सामान्य माणूस कसा जगावा, हा प्रश्न आता सतावत आहे.
आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलीस यंत्रणा नेमकी काय करतेय? कायद्याचे राज्य राखण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा कुंभकर्णाच्या झोपेत आहे का? पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच गुंडांचे मनसुबे वाढत आहेत. आता तरी पोलीस प्रशासनाने जागे होऊन कठोर कारवाई करावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, अन्यथा अमृतधामाचे रूपांतर रक्तधामात होण्यास वेळ लागणार नाही.