शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – राधाकृष्ण विखे पाटील……! महसूल विभागाची आढावा बैठक संपन्न …….!
लाल दिवा -नाशिक, दिनांक: 13 मे, 2023
शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा महसूल विभागाच्या आयोजित आढावा बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पाराधे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम जिल्ह्यात १५ जून २०२३ पर्यंत राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार व मंडळ अधिकारी यांनी गावपातळीवर जनजागृतीसह विविध आवश्यक दाखले व योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासोबतच गावपातळीवरील विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत तातडीने निकाली काढण्यात यावीत, अशा सूचना महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.
बैठकीच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या सद्यस्थितीची माहितीचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्क विभाग, भूसंपादन व पशुसंवर्धन विभागांनी केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण यावेळी केले.