युवकाची आत्महत्या: पोलिसांचा वेगवान तपास, चौघांवर गुन्हा दाखल!
पंचवटी !मजुरवाडीतील आत्महत्या प्रकरण: पोलीस निरीक्षक कड यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास सुरू!
लाल दिवा-नाशिक,दि.२७:- पंचवटी(प्रतिनिधी) मजुरवाडी, संजयनगर येथील २२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून परिसरात खळबळ उडाली असतानाच, पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने कारवाई करत चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. गौरव रमेश पाटील असे मृताचे नाव असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. समीर शहा, मेहनत समीर शहा, हसीना शेख आणि हसन शेख या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे गौरवच्या ओळखीचे होते. गेल्या काही दिवसांपासून यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गौरवच्या आई वंदना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपींनी त्यांच्या मुलाला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. गुन्ह्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीसांकडून देण्यात आले आहे.