पंचवटी पोलीसांचा शर्थ, घरफोडी चोरीतील दोषींना कारावास…!
लाल दिवा-नाशिक,ता.३१:-पंचवटी परिसरात दहशत माजवणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना आज न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पंचवटी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या २० मार्च २०२४ रोजी दुपारी १२.४५ ते १५.२३ वाजताच्या दरम्यान ओमकारनगर, लामखेडे मळा येथील स्वामी सोसायटी जवळील चैतन्यपर बंगल्यातील प्लॉट क्रमांक ०८/०९ या ठिकाणी ही धाडसी घरफोडी झाली होती. याप्रकरणी ५२ वर्षीय प्रशांत गोपीचंद ठाकरे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान अस्लम अतिक शेख (वय २६, रा. महंमद अली रोड, मुसाफीर खाना जवळ, दर्गा जवळ, भिवंडी) आणि पोपट शंकर कणिंगध्वज (वय ३२, रा. मु.पो.शेरी कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली.
आज नाशिक येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्र. ०८ यांनी दोषींना शिक्षा सुनावली. अस्लम शेख याला भादंवि कलम ३८० अन्वये ५ वर्षे सक्तमजुरीची कैद आणि ५००० रुपये दंड, तसेच कलम ४५४ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरीची कैद आणि ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी ३ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. तर पोपट कणिंगध्वज याला भादंवि कलम ४११ अन्वये २ वर्षे सक्तमजुरीची कैद आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास त्यालाही ३ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार १८६७/ एम.टी. नांदुर्डीकर, पोहवा. ४५०/एम.ए. खंबाईत, मपोकॉ १०१४/पी.पी. गोसावी यांनी केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदीप मिटके आणि पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे पंचवटी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.