नाशिक मध्ये पुन्हा एकदा खुन सत्र ; ऐन होळीच्या रात्री तरुणाच्या निघृण हत्येने शहर हादरले..!
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
लाल दिवा : मागील भांडणाची कुरापत काढून सहा जणांच्या टोळक्याने युवकाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निघृण हत्या केल्याची घटना पंचवटीतील फुलेनगर येथे काल (दि. 24) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांत दोन जणांना ताब्यात घेतले असून, इतर चौघांचा शोध सुरू आहे. यात चार मारेकरी विधिसंघर्षित आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मोहित श्रीपत उफाडे (वय 23, रा. कालिकानगर, मायको हॉस्पिटलच्या मागे, पंचवटी, नाशिक) हा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतो. त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल (दि. 24) मध्यरात्रीच्या सुमारास मोहित उफाडे याचा भाऊ नीलेश उफाडे वय 21) हा त्याचा मित्र उमेश साबळे याच्यासोबत फुलेनगर येथील म्हाडा बिल्डिंगच्या मागे मोकळ्या मैदानाजवळ गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी आरोपी विश्वास बाबर व इतर पाच जण (सर्व रा. फुलेनगर, पंचवटी) हे तेथे आले. या टोळक्याने मागील भांडणाच्या कारणावरून कुरापत काढत नीलेश उफाडे याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान झटापटीत झाले. त्यात या सहा जणांनी त्यांनी सोबत आणलेल्या धारदार हत्याराने नीलेशच्या मानेवर, पोटावर, पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याने तो जागीच झाला. मयत नीलेश उफाडे याच्यावर याच्यापूर्वीच पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.