उद्धव ठाकरें दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उबाठा माजी नगरसेवकास मारहाण…!
लाल दिवा-नाशिक,ता .२२: विहीतगाव नाका येथे शिवसेना उबाठा गटाच्या वतीने स्वागत फलक लावण्यासाठी जागेची पाहणी करणाऱ्या एका माजी नगरसेवकाला तिघा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. शिवसेनेचे माजी नगरसेवक अस्लम ऊर्फ भैय्या युसुफ मनियार हे शनिवारी (दि. २०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विहीतगावनाका सिग्नल येथे योगेश गाडेकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या फलक लावण्यासाठी जागेची पाहणी करत होते. यावेळी बागूलनगर, विहीतगाव येथे राहणारे संशयित राहुल बनकर ऊर्फ लवटे, हर्षद बागुल ऊर्फ डिंग्या यांनी मनियार यांना ‘तू येथे काय करतो, कशाला आला असा जाब विचारत धक्काबुक्की केली. यावेळी बागुल याने फोन करून तेथे संशयित प्रशांत बागूल ऊर्फ ठुम्या याला बोलवून घेतले.
तिघांनी मनियार यांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.