शिवसेना आ. सुहास कांदे यांच्या फिर्यादीवरून पोलीस अधिकारी निलेश माईनकरवर गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल !
लाल दिवा, ता. ६ : फसवणूक तसेच अपहाराच्या जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराकडून चार लाखांची खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकरवर गंगापूर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी फिर्याद दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे.
आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच माईनकरची बदली शहर नियंत्रण कक्षात केली होती. त्याला याच प्रकरणाची किनार होती, हे स्पष्ट झाले आहे. सन २०१६ मध्ये महात्मानगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने फसवणुकीसंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा दाखल गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग केला होता. तेव्हा गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक माईनकर होते. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा न्यायालयात केला आहे. त्रयस्थ व्यक्तीमार्फत चार लाखांची खंडणी मागितल्याचे न्यायालयात दाखल दाव्यावर नमूद आहे. त्यामुळे खंडणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कांदे यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यानुसार माईनकरवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. गंगापूर पोलीस तपास करत आहेत. सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने फिर्याद दिल्याने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे.