“द”….. दारूचा नव्हे तर…..”द”……दुधाचा’…..!
लाल दिवा : व्यसनामुळे गंभीर आजार होतातच. परंतु व्यसनामुळे नपुंसकत्व येते तसेच व्यक्तीचा विवेक हळूहळू संपुष्टात येतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसते.
व्यसनी पदार्थांची सहज उपलब्धता, क्रिकेटवीर व सिनेकलावंत यांच्या व्यसनी पदार्थांच्या आकर्षक जाहिराती, महसूल मिळवण्याच्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ करणारे व्यसनाला मोकळीक देणारे शासनाचे धोरण, सण- समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यांमध्ये व्यसनाला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, मान्यता अशा प्रमुख कारणांमुळे. विशेषतः नवीन पिढी वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसते.
अगदी शाळकरी मुलांपासून मद्यपानाचे व्यसन समाजात मूळ धरू लागल्याचे दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.
महाराष्ट्र अंनिस अगदी सुरुवातीपासून व्यसन विरोधी अभियान राबविते . तसेच व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन करते.
दरवर्षी डिसेंबर महिन्यातला शेवटचा पंधरवाडा हा व्यसनविरोधी पंधरवाडा म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने महाराष्ट्रभर विविध शाळा, महाविद्यालयातून तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात.
रविवार ३१ डिसेंबर २०२३ हा वर्षाचा शेवटचा दिवस व नवीन वर्षाचे स्वागत म्हणून जल्लोषात साजरा करण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मद्यपान केले जाते. त्यामध्ये सराईत मध्यपींसोबतच नवीन तरुण पिढी मद्यपानाची चव चाखण्याची दाट शक्यता असते.
म्हणून महाराष्ट्र अंनिसची नाशिक शाखा तर्फे हुतात्मा स्मारक बाहेर ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता, ‘द, दारूचा नव्हे तर द दुधाचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे सभासद नोंदणी अभियानही राबवले जाणार आहे. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे महाराष्ट्र अंनिसचे डाॅ ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा डाॅ सुदेश घोडेराव, प्रल्हाद मिस्त्री,राजेंद्र फेगडे, नितीन बागुल,महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, प्रा आशा लांडगे , कोमल वर्दे आदींनी आवाहन केले आहे.