नाशिकहून महाराष्ट्र पोलिस दलासाठी अनोखी मानसिक आरोग्य हेल्पलाइन “निरामय” सुरू
निरामय”: पोलिसांच्या मनाला आधार देणारी नवी आशा
लाल दिवा-नाशिक,दि.१८:- (प्रतिनिधी) – कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक नवा आधार मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “निरामय” या खास मानसिक आरोग्य हेल्पलाइन सेवेचा नाशिक शहरात शुभारंभ करण्यात आला.
नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक (भा.पो.से.) यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिस दलातील सदस्यांना कामाच्या ताणतणावातून येणाऱ्या मानसिक आव्हानांवर भाष्य केले आणि “निरामय” द्वारे मिळणार्या महत्त्वपूर्ण आधारावर प्रकाश टाकला.
ही अनोखी सेवा महाराष्ट्र पोलिस आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘एमपॉवर’ या मानसिक आरोग्य उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे. श्रीमती नीरजा बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील एमपॉवर या उपक्रमाचे पोलिस दलाशी सहकार्य राहणार आहे.
- “निरामय” च्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये:
ऑनलाइन आणि ऑफलाईन मानसिक आरोग्य सेवा: ही सेवा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध असेल.
इनबाउंड आणि आउटबाउंड कॉल सुविधा: ही सुविधा पोलिस दलातील सदस्यांना हेल्पलाईनवर कॉल करण्यासोबतच, गरजूंना स्वतःहून संपर्क साधण्याची देखील परवानगी देईल.
“निरामय” ही सेवा महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असा विश्वास पोलीस आयुक्त श्री कर्णिक यांनी व्यक्त केला.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलिस दलातील सदस्यांना त्यांच्या कामाच्या ताणतणावांना तोंड देण्यासाठी आणि मानसिक समतोल राखण्यासाठी प्रशिक्षित सल्लागारांची मदत मिळणार आहे.