नाशिक पश्चिम: “उमेदवारी निश्चित समजू नका”, खडसेंनी दिला इशारा; १५ इच्छुक आणि आमदार धास्तात..!
लाल दिवा-नाशिक,दि.२:”उमेदवारी निश्चित समजू नका, नव्यांना संधी मिळू शकते” असा इशाराच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाशिक पश्चिममधील भाजपच्या इच्छुकांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या एका विधानामुळे विद्यमान आमदारांसह पंधराहून अधिक इच्छुक धास्तावले आहेत.
आम्रपाली लॉन्स येथे शनिवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात श्रीमती खडसे यांनी हा इशारा दिला. “पक्षाचे काम करा, उमेदवारीची चिंता करू नका. उमेदवारी कोणालाही अद्याप निश्चित नाही. नव्यांनाही संधी मिळू शकते, हे लक्षात ठेवा”, असे त्या स्पष्टपणे म्हणाल्या.
त्यांच्या या विधानामुळे नाशिक पश्चिममधील भाजपाच्या तिकिटासाठी उत्सुक असलेल्या पंधराहून अधिक इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय विद्यमान आमदारांनाही धक्का बसला आहे.
दरम्यान, या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. एका महिला कार्यकर्त्याने आपल्या दिव्यांग मुलाला आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली तर इतर कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे, या मेळाव्यात एका इच्छुक उमेदवाराने कार्यकर्त्यांच्या रांगेत बसून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.