नाशिक पोलिसांचा सुवर्ण विजय! ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत ठसा उमटवला!
ठाणेच्या क्रीडांगणावर नाशिक पोलिसांचा जलवा!
लाल दिवा-नाशिक,ता.२:-ठाणे, महाराष्ट्र (विशेष प्रतिनिधी) – ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५ चा थरारक असा समारोप झाला आहे. या स्पर्धेत नाशिक पोलिसांनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच अचंबित केले आहे. ठाणे येथे झालेल्या या प्रतिष्ठित क्रीडास्पर्धेत नाशिक परिक्षेत्राच्या पुरुष बास्केटबॉल संघाने चित्तथरारक अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत केलेल्या या विजयाने नाशिक पोलिस दलाच्या शौर्याची गाथा रचली आहे.
नाशिक शहर पोलिस दलाच्या या कुशल खेळाडूंनी आपल्या अद्वितीय कौशल्याने व अतुलनीय खेळ भावनेने सर्वांची मने जिंकली. त्यांच्या या यशाचे श्रेय केवळ त्यांच्या कौशल्यालाच नाही तर त्यांच्या अथक परिश्रमास व अविरत निष्ठेला जाते. गजानन पाटील, मनोज भोये, कय्युम सय्यद, जावेद शेख, सुरज धूम आणि मयूर धूम या खेळाडूंनी अविस्मरणीय कामगिरी करत नाशिकचे नाव उंचावले आहे.
बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदकाची चमक तर खासच होती, परंतु इतर खेळांमध्येही नाशिकच्या महिला खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पॉवरलिफ्टिंगमध्ये अश्विनी भोसले यांनी सुवर्णपदक जिंकत आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. तर वेटलिफ्टिंगमध्ये अश्विनी भोसले आणि सोनाली काटे यांनी रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव रोशन केले.
या यशाबद्दल पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहेत. त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस आयुक्त श्री. आशुतोष धुंबरे यांच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विशेष आभार. खेळाडूंच्या सोयीस्कर राहण्याची व खेळाची उत्तम व्यवस्था करून त्यांनी या स्पर्धेला अविस्मरणीय बनवले.