नाशिक शहर पोलीसांची धडक कारवाई: गुन्हेगारांना धडकी, टवाळखोरांना झटका!
नाशिक पोलिसांकडून ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम
(नाशिक लाल दिवा वृत्तसेवा)दि.१:-नाशिक शहरात वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटना आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या टवाळखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान शहरात ‘स्टॉप अँड सर्च’ मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. या धाडसत्राने गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवली असून, टवाळखोरांना चांगलाच झटका बसला आहे.
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी कसून चौकशी केली. संशयास्पद व्यक्ती, वाहने आणि ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १ व २) यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या धडक कारवाईत तब्बल १३२८ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच १३११ संशयीत वाहनांची कसून तपासणी करून त्यांच्यावर १,५८,२५०/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ सुरुवात आहे. भविष्यातही अशा अचानक स्टॉप अँड सर्च मोहिमा राबवण्यात येतील. गुन्हेगारांना आणि टवाळखोरांना कठोर शासन होईल याची खात्री पोलिसांनी दिली आहे. या धडक कारवाईमुळे नाशिककरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.