खाकीचा मुखवटा, लुटीचे मनसुबे: बनावट पोलिसांनी महिलेला लुटले

नाशिकमध्ये बनावट पोलीसांचा सुळसुळाट, देवळात जाताना महिलेचे ८० हजारांचे दागिने लंपास

लाल दिवा-नाशिक, ५ सप्टेंबर २०२४ (प्रतिनिधी) : शहरात बनावट पोलीसांचा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी पंचवटी परिसरात देवळात जाणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला दोन बनावट पोलीसांनी गंडवून तिच्याकडील ८० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. भारती लहेरीभाई सोलंकी या देवळात जात असताना गोविंदानंद अपार्टमेंट समोर दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. या इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवत परिसरात चोरी झाल्याचे सांगून सौ. सोलंकी यांना त्यांचे दागिने काढून दाखविण्यास सांगितले. 

या बनावट पोलिसांवर विश्वास ठेवून सौ. सोलंकी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी (८.५ ग्रॅम, ओमचे पेंडल) आणि हातातील दोन सोन्याच्या बांगड्या (प्रत्येकी २० ग्रॅम) काढून दिल्या. दागिने मिळताच हे दोघे मोटारसायकलवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९१/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३१८(४), २०४, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव या प्रकरणाचा तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. 

नागरिकांनी अशा प्रकारे कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!