मुंढेगाव शिवारातील कुरियर व्हॅनवरील धाडसी दरोडयाचा उलगडा झाला उलगडा…….आग्रा येथील ०५ आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद ……..०३ माजी सैनिकांचा सहभाग……. २.५ किलो सोने व ४५ किलो चांदी असा पावणे दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत…… नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलीसांची यशस्वी कामगिरी…….!
लाल दिवा-नाशिक,ता .२५ :- दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरियर सर्व्हसच्या मारूती इको व्हॅनवरील चालक व कुरियर पोहोच करणारे त्यांचे दोन कामगार मुबंई ते नाशिक असे सोने, चांदीचे दागिन्यांचे कुरियर घेवून जात असतांना, घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर माणिकखांब ते मुंढेगाव शिवारात कारमधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरियर व्हॅनला अडवून चालकाचे डोळयात मीरचीपूड फेकून, लोखंडी रॉडचा धाक दाखवून साडेचार किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे, १३५ किलो चांदीचे दागिने व चांदीच्या विटा, मोबाईल फोन असा एकूण ३,६७,५५,०००/- (०३ कोटी ६७ लाख ५५ हजार) रूपये किंमतीचा मुद्देमाल धाडसी दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता. सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाणे येथे गुरनं ३५/२०२४ भादंवि कलम ३९५, ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग श्री. सुनिल भामरे यांनी सदर दरोडयाच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून घटनास्थळी भेट मार्गदर्शन केले होते. त्यानूसार गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांचे पथकांनी वरील गुन्हयातील प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपींचे वर्णन व त्यांची बोलीभाषा, तसेच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयातील दरोडेखोर हे उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याचे निश्चीत केले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलीसांचे पथकांना आग्रा येथे रवाना करण्यात आले, पथकातील अधिकरी व अंमलदार यांनी अतिशय थंड हवामानात सतत तीन दिवस, अहोरात्र पाळत ठेवून आग्रा जिल्हयातील खेरागड व इटौरा परिसरातून आरोपी नामे १) देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार, वय ३३, रा. नौनी, ता. खेरागड, जिल्हा आग्रा, राज्य उत्तरप्रदेश, २) आकाश रामप्रकाश परमार, वय २२, रा. नौनी, ता. खेरागड, जिल्हा आग्रा, राज्य उत्तरप्रदेश, ३) हुबसिंग मुल्लासिंग ठाकुर (माजी सैनिक), वय ४२, रा. वेंकोरा, जिल्हा भरतपुर, राज्य राजस्थान, ४) शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकुर (फळ व्यापारी), वय ४५, रा. नगला उद्या रोड, खेरागड, ता. खेरागड, जिल्हा आग्रा, राज्य उत्तरप्रदेश, ५) जहिर खान सुखा खान (माजी सैनिक), वय ५२, रा. खेरागड, जिल्हा आग्रा, राज्य उत्तरप्रदेश यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपींना कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार नामे ६) सतेंदरसिंग यादव (माजी सैनिक), रा. भोजपुर, आग्रा, ७) दालचंद गुर्जर, रा. नगला माधव, ता. खेरागड, राज्य उत्तरप्रदेश तसेच ८) नंदु गारे (चालक), रा. बहादुरी, ता. चांदवड, जि. नाशिक यांचेसह गत आठवडयात मुंबई-आग्रा महामार्गावर माणिकखांब ते मुंढेगाव शिवारात एका कुरियर व्हॅनवर दरोडा टाकून सोने-चांदीचे कुरियर असलेले पार्सल जबरीने लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयात ताब्यात घेतलेले आरोपी क. १ ते ५ यांना अधिक विचारपूस केली असता, यातील आरोपी आकाश परमार याने यापुर्वी जय बजरंग कुरियर सर्दीस, मुंबई येथे कुरियर बॉय म्हणून काम केलेले आहे. कुरियर पार्सल पोहोच करण्यासाठी जय बजरंग कुरियर सर्व्हसेसच्या डिलीव्हरी व्हॅन, तसेच कुरियर कोणत्या शहरात कधी जातात याबाबत त्याला सर्व माहिती होती. सदर गुन्हयातील कुरियर व्हॅन मारूती इको कार क. एम.एच.१२.यु.जे.७९४८ या व्हॅनचा फोटो आरोपी आकाश परमार याचेकडे होता.
तसेच यातील मुख्य सुत्रधार देवेंद्रसिंग उर्फ करवा याचेवर यापुर्वी गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्हयात वरील गुन्हयाप्रमाणेच महामार्गावरील वाहनातून सोने चोरी केल्याचा गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचा साथीदार आरोपी क. २ आकाश परमार याचेशी संपर्क साधून, कुरियर सर्दीसच्या डिलीव्हरी व्हॅनची माहिती घेतली व त्याप्रमाणे त्याचे इतर साथीदारांसह कुरियर व्हॅनमधून सोने चोरी करण्याचा प्लॅन केला, ठरल्याप्रमाणे वरील सर्व आरोपींनी आग्रा येथून निघून, मुंबई-आग्रा महामार्गाने एक इर्टिगा व एक वॅगन आर कार घेवून घोटी टोल परिसरात घटनेच्या दोन दिवस आगोदर टेहाळणी केली. त्यानंतर दि. १८/०१/२०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास त्यांनी जय बजरंग कुरियर सर्व्हसेसच्या वरील मारूती इको व्हॅनचा घोटी टोल परिसरातून पाठलाग करून माणिकखांब ते मुंढेगाव शिवारात सदर व्हॅनला त्यांची इर्टिगा कार आडवी लावून चालकाचे डोळयात मिरचीपूड टाकून कुरियर डिलीव्हरी बॉय यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून सोने चांदीचे पार्सल असलेला एकूण ०३ कोटी ६७ लाख ५५ हजार चे सोने चांदीचे दागिने असा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने घेवून गेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपी १) देवेंद्रसिंग उर्फ करवा २) आकाश परमार, ३) हुबसिंग ठाकुर, ४) शिवसिंग ठाकुर, ५) जहिर खान यांचे कब्जातून वरील गुन्हयात दरोडा टाकून चोरून नेलेले २.५ किलो सोन्याचे दागिने व ४५ किलो चांदीचे दागिने, तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व वॅगन-आर कार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची ०९ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांचे पथक करीत आहे.
सदर गुन्हयाचे तपासात वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील, सपोनि श्री. संदेश पवार, तसेच स्थागूशाचे सपोनि श्री. गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, पोहवा सागर काकड, शांताराम घुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, पोकॉ नौशाद शेख, तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोउनि सुदर्शन आवारी, पोना रामकृष्ण लहामटे, मिलींद पवार, चालक पोहवा भुषण थोरमिसे यांचे पथकाने वरील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.
पोलीस पथकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५,०००/- रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.