मिरचीचा आवाज, लैंगिक शोषणाला नकार! ‘सेफ अँड साऊंड’ टॉक शो गाजला!
नाशिकमध्ये ‘सेफ अँड साऊंड’ चर्चेने रंगला शंकराचार्य संकुल
लाल दिवा-नाशिक, दि. ५ सप्टेंबर २०२४ – लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी ९८.३ रेडिओ मिरची आणि नाशिक स्कूल असोसिएशनने सुरू केलेल्या ‘मिरची सेफ अँड साऊंड’ उपक्रमाने नाशिकमध्ये जनजागृतीचा धडाका घातला आहे. गेल्या सहा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच यावर प्रशिक्षण देण्यात आले. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज शंकराचार्य संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेफ अँड साऊंड’ टॉक शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या टॉक शोमध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, बालरोग तज्ञ डॉ. तृप्ती महात्मे, होमिओपॅथिक मानसोपचार तज्ञ डॉ. वृषीनित सौदागर, शिक्षण तज्ञ सचिन जोशी आदी मान्यवरांनी आर जे भूषण यांच्याशी संवाद साधला. लैंगिक शोषणा संदर्भातील कायदे, त्याचे परिणाम आणि मुलांचे संरक्षण कसे करावे यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षक आणि पालकांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे, भोसला मिलिटरी कॉलेजचे विश्वस्त जयंत खेडेकर, प्राचार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्पेलियर स्कूल, शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक पोलीस आयुक्तालय, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिट्रीशियन आणि नम्रता ऍडव्हर्टायझिंग यांनी सहकार्य केले.