दिव्यांग बांधवांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी : मंत्री छगन भुजबळ…!

लाल दिवा-नाशिक,ता.३ :- दिव्यांग बांधवाना सक्षम आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्य जीवन जगावे. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हि जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय, भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, नाशिक यांच्यामार्फत दिव्यांग बंधू भगिनींसाठी एडीप (ADIP) योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी पंचायत समिती उपअभियंता प्रशांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती येवला, डॉ.शरद कातकाडे, गट शिक्षण अधिकारी संजय कुसाळकर, दिव्यांग संघटना समन्वयक विष्णू वैरागळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जून कोकाटे, माजी नगरसेवक अल्केष कासलीवाल, कार्यक्रम समन्वयक संतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगाना दिव्यांग संबोधून समाजात त्यांना एक वेगळा सन्मान निर्माण करून दिला आहे. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मनोबल वाढून त्यांनीही इतरांसारखे जीवन व्यतीत करावे हाच शासनाच्या योजनांचा प्रमख उद्देश आहे. सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, नाशिक यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोग व्यक्तींच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य विकसित करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना समाजात समान संधी मिळावी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यादृष्टीने शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना दिव्यांगांसाठी राबविण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये व शासकीय नोकरीतही आरक्षण, सवलती, सूट आणि प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच काही योजनांमधून दिव्यांग बांधवांना २ टक्के वार्षिक व्याजदर आकारणी करून रूपये ५ लाखापंर्यंत कर्जही दिले जाते. यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली असून याकरीता ५०० कोटींचे भागभांडवलही उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

‘जीवन हे संग्राम, बंदे ले हिम्मत से काम’ असे सांगून दिव्यांगांचे मनोबल वाढवित मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

जुलै २०२३ मध्ये आयोजित शिबिराच्या माध्यमातून सुमारे १०३० दिव्यांग बांधवाची आर्टीफीशिअल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून विविध सहाय्यभूत साधन मिळण्याबाबत त्यांची नोंदणी केली. त्यामधून आज यातील ५९५ दिव्यांग बांधवाना विविध आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये सायकल, विविध प्रकरच्या स्टिक्स, व्हीलचेअर, चष्मे, श्रवणयंत्र, मोबाईल आणि विशेषतः बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी गाडीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ५ कर्णबधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.

 

दिव्यांगजन सहाय्यता विभाग हा दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी त्यांना समाजात समान संधी उपलब्ध करून देत सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगाना टिकाऊ आणि आधुनिक साहित्य पुरविण्यात येऊन त्यांना शारीरक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देत त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न आहे. असे दिव्यांग संघटना समन्वयक विष्णू वैरागळ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरवातीला समता प्रतिष्ठान संचालित मायबोली संस्थेच्या मुकबधीर विद्यार्थ्यांकडून स्वागत गीताचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून व्यावसायिक वाहनांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले वाटप

तरूणांना व्यवसायाची व रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आज ९ व्यावसायिक वाहनांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चालकांना वाहनांच्या चाव्या सूपूर्त करीत मंत्री श्री. भुजबळ यांनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!