मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यिन कला महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान……विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी यिन कला महोत्सव महत्वाचं व्यासपीठ …. मंत्री छगन भुजबळ….!
लाल दिवा -नाशिक,दि.२१ : विद्यार्थ्यांना वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक दृष्टीकोनातून पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणूस म्हणून उभारणीचे ज्ञान मिळवून देण्यासाठी ‘यिन कला महोत्सव विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
सकाळ माध्यम समूह यिन कला महोत्सवाचा समारोप नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ.राहुल रनाळकर, युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील,यिनचे सदस्य, विद्यार्थी यांच्यासह सकाळ माध्यम समूह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यिन कला महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सन १९३२ पासून, सुरू झालेला “सकाळ’ माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून “सकाळ’ माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. तसेच सकाळ समुह नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सकाळ माध्यम समूहाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी घेतलेला यिन कला महोत्सव अतिशय महत्वपूर्ण आहे.
विद्यार्थ्यांना आज मिळालेली कौतुकाची थाप त्यांना भावी वाटचालीस प्रेरणादायी राहील. सकाळ माध्यम समूहाने तरुणांसाठी यिन, महिलांसाठी तनिष्का असे विविध उपक्रम राबविते. त्यामाध्यमातून त्यांना व्यासपीठ उभं करून देण्याचे काम समूह करत असते. संस्थेचा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशातील कुठल्याही आपत्तीच्या काळात सकाळ मदतीसाठी नेहमीच पुढे असतो. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून मदत देण्याचे त्यांचे काम अविरतपणे सुरु आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासातही सकाळचे काम सुरु आहे. राज्यातील विविध महत्वाच्या विषयांवर आवाज उठवून ती शासन आणि जनतेपर्यंत पोहचवून ती सोडविण्यासाठी देखील संस्थेचे काम अतिशय मोलाचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.