देशात ५४ टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी गेली ३५ वर्ष लढत आलो -: मंत्री छगन भुजबळ…..!
लाल दिवा-इगतपुरी, नाशिक, दि.१८ नोव्हेंबर:- देशात ५४ टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी गेली ३५ वर्ष लढत आलो आहे. यापुढील काळातही कितीही संकटे आली तरी लढत राहणार असून ओबीसी समाजावर जर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज मोडाळे ता.इगतपुरी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, विष्णू चव्हाण, प्रशांत कडू, सुरेश सूर्यवंशी, संपत डावखर, नारायण वळकंदे, शिवा काळे, मोडाळेच्या सरपंच शिल्पाताई आहेर, यांच्यासह पदाधिकारी, या भागातील सर्व नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका आहे, पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला हवे ही मागणी आहे. कारण जबरदस्तीने कोणाला ओबीसी मध्ये घुसवले तर परत कोर्ट कचेऱ्या होतील आणि हा प्रश्न तसाच पडून राहील. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समाजात जे दबलेले पिचलेले आहेत जे मागास आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आहे. आजही एससी, एसटी प्रवर्गाला आरक्षण देऊन इतके वर्ष झाले तरी देखील आजही मोठा समाज गरिबीच्या छायेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे सहजासहजी मिळालेलं आरक्षण नाही. यासाठी अनेक वर्ष लागली अनेक आयोग झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीच्या खंडपिठाने हे आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय दिला. आज ओबीसी समाजात पावणे चारशे जाती झाल्या आहे. त्यात ओबीसीत समावेश होण्यासाठी काही लोक अडून बसले, जाळपोळ झाली मग आम्ही कसे शांत बसणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- ते म्हणाले की, आंदोलन स्थळी पोलिसांवर मोठी दगडफेक झाली. परंतु मिडिया समोर एक बाजू आली की पोलीस हल्ला करता आहे. पण त्या अगोदर काय झाले, प्रचंड दगडांचा मारा त्यावेळी झाला. महिला पोलिसांना मारले गेले. पोलिसांना मारले गेले म्हणून त्यांनी काठ्या चालवल्या त्यात ७० पोलीस जखमी झाले. त्यानंतर बीड मध्ये वाटेल त्याची घरे जाळली गेली आणि पोलिसांवर कारवाई झाली. हे जे झाले ते सत्य समोर आले असते तर त्यांना सहनभुती मिळाली नसती. महिला पोलिसांना विचारा नक्की काय झाले ते असा सवाल त्यांनी केला.
- ते म्हणाले की, कुणाला काय मागायचे ते शांततेने मागायला हवे. तुम्ही तुमच्यासाठी पुढे आला मग मी का ओबीसीसाठी पुढे येऊ नको असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मला मंत्री पद, आमदारकीची फिकीर नाही. गावोगावी लावलेल्या गावबंदीच्या फलकांवर बोलतांना ते म्हणाले की, या देशात कोणीही कुठेही जाऊ शकतो त्याला विरोध करू नका, या देशात संविधान आहे. पोलिसांनी आणि इतर यंत्रणांनी याकडे लक्ष देऊन सर्व फलक तात्काळ हटवावे अशा सूचना त्यांनी केल्या. ते म्हणतात की, निवडणुकीत भुजबळांना पाडून टाकू, अरे पण भुजबळ किती लोकांना पाडेल हे बघा, निवडणुकीत जर अशी वाटणी झाली तर काय होईल असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, छगन भुजबळ हे दोन जातीत वितुष्ट निर्माण करता आहे त्यांना मंत्रिपदावरून काढा. मला त्यांना सांगायचं आहे की, आमचे शाहू महाराज मागासवर्गीयांना पुढे घेऊन जाण्यासाठी लढत होते. त्याच गादीवर तुम्ही आहात तुम्ही एका समाजाची भूमिका का घेऊन बोलता. महाराज हे सर्व समाजाचे आहे. तुम्ही सांगायला हवे होत सगळ्यांचे आरक्षण शाबूत ठेवा. जेव्हा बीड मध्ये जाळपोळ झाली तेथे जाऊन त्यांचे अश्रू पुसायल हवे होते, हे पण तुमचे काम होत. वेगवेगळे समाज पक्ष यांच्या कडून माझी हीच अपेक्षा की आमचे पण म्हणणे ऐकून घ्या असेही ते म्हणाले.