मंत्री भूसेंनी वर्षानुवर्ष रेंगाळलेल्या घोड्याची आडीचा प्रश्न सोडवला; घोड्याची आडी आता अधिकृत. ; नागरिकांनी मांडले मंत्री दादाजी भुसे यांचे आभार…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१५ :- देवळा तालुक्यातील वार्शी – हनुमंतपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी घोड्याचीआडी ही आदिवासी वस्ती स्वातंत्र्या पासून वास्तव्यास आहे, मात्र कालांतराने ही जागा वन विभागाने ताब्यात घेतली. पुरावे नसल्याने या वस्तीला अनधिकृत घोषित करण्यात आले होते. तसेच स्थलांतरित करण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. मात्र स्थानिक नेते हेमराज (सुदाम बापू) सोनवणे यांनी या वस्ती संदर्भात नाशिक जिल्हा पालकमंत्री यांचेकडे पाठपुरावा करून या वस्तीवरील नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली होती.
वार्शी – हनुमंतपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री देसले यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. अपील कर्ते बन्सी मोतीराम सोनवणे यांनी ग्रामस्थांची बाजू लावून धरली प्रत्येक मीटिंग तसेच सुनावणीला देवळा, चांदवड, नाशिक या ठिकाणी उपस्थित राहून निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा घेतला व वस्ती धारकांना न्याय मिळवून दिला, चांदवड येथील निर्णय हा स्थानिकांच्या विरोधात गेल्यानंतर देखील याचिकाकर्ते व ग्रामसेविका यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात वन हक्क समितीकडे अपील करत ग्रामस्थांची बाजू प्रकर्षाने लावून धरली यामुळे हा निकाल रहिवाशांच्या बाजूने लागला आहे. 1 हेक्टर जागा मंजूर केली आहे. या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळात शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामसेविका यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना पत्रव्यवहार करत सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली, या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून पालकमंत्री भुसे यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सत्यता पडताळून निर्णय देण्याचे आवाहन केले होते. मंत्री भुसेंकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने हा वर्षानुवर्ष रेंगाळलेला विषय निकाली निघत गावकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागला आहे. आजच्या सुनावणीत वनहक्क समितीने 2005 पूर्वीचा रहिवास असलेल्या नागरीकांना वास्तव्यास कायम केले आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी मंत्री दादाजी भुसे, ग्रामसेविका देसले तसेच खेमराज सोनवणे यांचे आभार मानले आहेत.
घोड्याची आडी ही वस्ती रेकॉर्डवर नसल्याने स्थानिकांना कुठल्याही शासनाच्या योजना मिळत नव्हत्या यामुळे शासनाच्या योजनांपासून स्थानिकांना वंचित रहावे लागत होते, प्रत्येक निवडणुकीत नागरिकांना वस्ती कायम करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी दिले मात्र कुणीही पूर्णत्वास नेले नाही. वस्ती कायम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खेमराज (सुदाम बापू) सोनवणे, याचिका कर्ते बन्सी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य राणी गणेश सोनवणे, रघु वालदे, निंबा धोंडू सोनवणे, वसंत सोनवणे, चिंतामण सोनवणे, गोरख सोनवणे, सावळीराम मोरे, निंबा पवार तसेच स्थानिक रहिवाशांनी मेहनत घेतली आहे.