एमडी विक्री करणारे टोळी जेरबंद; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुप्त बातमीची कडी जुळली, ड्रग्ज माफिया पोलिसांच्या जाळ्यात
लाल दिवा-नाशिक, १० जानेवारी २०२५: नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एमडी) विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६,१३,३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गणेश कैलास गीते (४५), स्वीटी सचिन अहिरे (२८), ऋतुजा भारकर झिंगाडे (२२) आणि पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (३६) हे नाशिक शहरात एमडीची विक्री करत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चौघांनाही रंगेहाथ पकडले. अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्सच्या मदतीने त्यांच्या ताब्यातून ७८.५ ग्रॅम वजनाचा ४,१५,५०० रुपये किमतीचा एमडी आणि १,९७,८२० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे हिच्यावर यापूर्वीही इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदांतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमली पदार्थ विरोधी पथकासह खंडणी विरोधी पथक आणि अंमली पदार्थ शोधक श्वान पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.