मांजाचा मृत्युयंत्रणा उधळला! नाशिकरोड पोलिसांची धाडसी कारवाई, लाखोचा माल जप्त
मृत्यूचा मांजा जप्त , विक्रेता गजाआड
नाशिक: पतंगाच्या रंगीबेरंगी उधाणामागे दडलेला मृत्यूचा सापळ उघड करीत नाशिकरोड पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीचा काळाबाजार उद्ध्वस्त केला आहे. सिन्नरफाटा मार्केट यार्ड परिसरात गुप्त बातमीच्या आधारे झालेल्या या धाडसी कारवाईत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांच्या टीमने हे अभियान राबविले.
पोलीस अंमलदार समाधान वाजे आणि अजय देशमुख यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, सिन्नरफाटा मार्केट यार्डमध्ये एक इसम नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी रवाना केले. पथकाने संशयास्पद इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोण्यांची झडती घेतली असता, त्यामधून वेगवेगळ्या रंगाचे तब्बल ९७ नायलॉन मांजाचे गट्टू सापडले. आरोपीचे नाव देवेंद्र गोविद शिरसाठ असे असून त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या मांजामध्ये सोनेरी आणि निळ्या रंगाचे ६७ गट्टू (किंमत ४६,९०० रुपये) आणि हिरवा, लाल आणि निळ्या रंगाचे ३० गट्टू (किंमत १५,००० रुपये) असा एकूण ६१,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.