अजित चव्हाण यांना खानदेश रत्न पुरस्कार प्रदान …!
लाल दिवा-नाशिक,ता .२५ : खानदेश महोत्सवात तिसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांचे फुल टू धमाल सादरीकरण, लावणी क्वीन माधुरी पवारच्या दिलखेचक अदांनी सादर केलेल्या लावणी नृत्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले गेलेले खानदेश रत्न पुरस्कार अशा रंगारंग कार्यक्रमांनी नाशिककरांची रविवारची सायंकाळ संस्मरणीय झाली.
नाशिक पश्चिम मतदार संघाच्या भाजपच्या आ. सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या पाचव्या खानदेश महोत्सवावातील गुलाबी थंडीत ठक्कर डोम येथे उत्तर महाराष्ट्र व नाशिक मधून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद देणारी ठरली. सुरुवातीला कीर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील कलावंत श्याम राजपूत, प्रभाकर मोरे यांच्या विनोदी प्रहसनाने उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवले. माधुरी पवारच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांना आपापल्या जागेवर थिरकायला भाग पाडले.
मध्यंतरात विविध क्षेत्रातील नामवंतांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सुनील बागुल, अजित चव्हाण, सचिन होळकर , शाम बडोदे, संदीप भदाणे, अनिल चांदवडकर, डॉ. मयूर पाटील, श्यामसुंदर राजपूत, प्रा. सुमती पवार, स्नेहा कोकणे पाटील, हेमंत पगार, किरण सोनार, आकाश पगार यांचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सीमा हिरे,विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री दादा वेदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महेश हिरे, योगेश हिरे आदी मान्यवर अतिथींच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. भारती पवार यांनी खानदेश महोत्सव हा नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी निखळ मनोरंजन, ज्ञानार्जन, प्रदर्शन, व्यवसायाची , पर्यटनाची , कलागुणांच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देणारा तसेच भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचा परिचय आणि आदानप्रदान यासाठी आमदार सौ. हिरे , महेश हिरे व रश्मी हिरे यांच्या अथक परिश्रमातून सातत्याने आयोजित केला जातो. एवढा मोठा इव्हेंट नाशिक मध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असावा असे गौरवोद्गारही डॉ. पवार यांनी यावेळी काढले.
पुरस्कार वितरणानंतर पुन्हा गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने आणि वनिता खरात यांच्या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांना लोटपोट हसवले. माधुरी पवार यांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे व दीप्ती हलवाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी कडाक्याच्या थंडीतही हजारो नाशिककरांनी हजेरी लावली.
नाशिक : खान्देश रत्नचे मानकरी व मान्यवर