खंडणीचा ससेमिरा! अजित पवार गटाच्या युवा नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल !
छत्रपती संभाजीनगरामध्ये खंडणीचा सुळसुळाट, सामान्य नागरिकांचे कोणी ऐकेल का?
लाल दिवा-छत्रपती, संभाजीनगर: शहरात खंडणीसाठी नवा ससेमिरा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अजित पवार गटाच्या युवा नेत्यासह संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाला आहे. या तिघांनी मिळून ‘गरुड झेप अकॅडमी’च्या मालकाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर दबावतंत्राचा वापर
काही दिवसांपूर्वी ‘गरुड झेप अकॅडमी’तील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. या दुर्घटनेचा फायदा घेत आरोपींनी अकॅडमीविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही आरोपींनी अकॅडमी संचालकांना सतत त्रास देण्याचे काम सुरू ठेवले होते.
- पैसे द्या नाहीतर बदनामी करू!‘
तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपींनी अकॅडमी संचालक निलेश सोनवणे यांना संपर्क साधला आणि थेट धमकी दिली. “तक्रारी थांबवायच्या असतील तर पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुमच्या अकॅडमीची बदनामी करू. ही बदनामी थांबवायची असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील.” सोनवणे यांनी सुरुवातीला एवढी रक्कम नसल्याचे सांगितले आणि सात लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. अखेर दोन्ही पक्षांमध्ये दोन लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरले. हे पैसे देतानाचा व्हिडिओ सोनवणे यांनी रेकॉर्ड केला आहे.
- शिक्षकांना मारहाण, क्लासेसची तोडफोड
याआधीही आरोपींनी अनेक गुन्हेगारी कृत्य केल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच याच टोळक्याने कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच आकाशवाणी येथील ‘आकाश क्लासेस’मध्ये घुसून तोडफोड करण्यात आली होती.
- पोलिसांनी केले गुन्हा दाखल
या खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ, अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड आणि रेखा वाहटुळे यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.