लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला बेचैन; प्रियकरसह आई-वडिलांवर गुन्हा !
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तरुणीला म्हसरुळ पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा
लाल दिवा-नाशिक,म्हसरुळ, १६ सप्टेंबर २०२४ (प्रतिनिधी) – प्रेमाच्या नावाखाली घृणास्पद कृत्य करत एका तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रियकर वैभव अशोक पाटिल (वय ३०, रा. थिटे नगर, पुणे) आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी वैभव यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या दरम्यान वैभवने लग्नाचे आमिष दाखवून फेब्रुवारी २०२४ मध्ये पुणे आणि नाशिक येथे तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हे तर वैभवचे वडील अशोक लक्ष्मण पाटिल (वय ५५) आणि आई मिनाक्षी अशोक पाटिल (वय ५०, दोघेही रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांनीही तरुणीला त्रास दिल्याचा आरोप आहे.
लग्नासाठी विचारणा केली असता वैभव आणि त्याच्या कुटुंबाने फिर्यादीच्या वडिलांचे नाशिक येथील घर त्यांच्या नावे करण्याची अट घातली. ही अट पूर्ण न झाल्यास लग्नास नकार देण्याची धमकी दिल्याने तरुणी हादरली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने म्हसरुळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी वैभवसह त्याचे वडील अशोक पाटिल आणि आई मिनाक्षी पाटिल यांच्यावर भादंवि कलम ६४(१), ६९, ७४, ७५(२), ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे.