त्रंबकेश्वर मधील परदेशी विद्यार्थ्यांची ग्रामीण पोलीसांकडून तपासणी…!
लाल दिवा -नाशिक,दि.२३: नाशिक : त्रंबकेश्वर परिसरातील महिरावणी येथे मोठ्या प्रमाणात परदेशस्थ विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. यात विशेषतः आफ्रिकन देशातील विद्याथ्र्यांची संख्या मोठी आहे.
मागील काही दिवसांपासून, सदर विद्यार्थ्यांकडून स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांकडे काही अंमली पदार्थ असावेत, अशी शंका देखील उपस्थित होत होती.
उपरोक्त कारणावरून, आज त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बिपिन शेवाळे यांच्या अधिपत्याखाली त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार त्याचप्रमाणे विशेष पथक व दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महिरावणी परिसरात राहणा-या अशा परदेशी विद्यार्थ्यांची व त्यांच्या निवासस्थानांची अचानकपणे तपासणी केली. यात सुमारे ३५ विद्यार्थ्यांच्या घरझडत्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचेकडे काहीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या नाहीत.
त्याचप्रमाणे, त्रंबक रोडवरील हॉटेल व लॉजेसमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने मागील आठवड्यापासून अशा हॉटेल आस्थापनांची कसून तपासणी करण्यात येत असून ती आणखी व्यापक करण्यात येत आहे..
नाशिक ग्रामीण पोलीसांकडून अवैध व्यवसाय विरोधात सातत्याने कारवाई चालू असून ती यापुढेही सदैव सुरू राहील. अवैध व्यवसायासंदर्भाने नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी ती नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक ६२६२ (२५) ६३६३ यावर द्यावी, माहिती देणा-यास त्याचे नाव देखील विचारण्यात येणार नाही. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अवैध व्यवसाय विरोधी कारवाईस नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.