जनसुरक्षा सर्व समावेशन मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी गंगाथरन डी…..!
लाल दिवा -नाशिक,ता.१५ : केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागामार्फत 30 जून 2023 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा योजनेसाठी जनसंपर्क मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत सहभागी करून घेत विमा सुरक्षा प्रदान केली जाणार असल्याने जनसुरक्षा सर्व समावेशन मोहिमेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 18 ते 70 वयोगटातील नागरिकांसाठी लागू असून या योजनेचा वार्षिक हप्ता 20 रूपये आहे. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळतो. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 18 ते 50 वयोगटातील नागरिकांचा समोवश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला 436 रूपयांचा हप्ता असून कोणत्याही कारणाने व्यक्तिीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रूपये 2 लाख विमा रक्कम मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा योजना यांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावरील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बँक शाखा त्यांच्या सेवा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमधील शाखा व्यवस्थापक, बँक मित्र व कर्मचारी यांच्या माध्यमातून मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय, बँक मित्र, बँक शाखा यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.