निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर…. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार…!
लाल दिवा : आगामी काही महिने निवडणुकींच आहेत. या काळात गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता गृहित धरून आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह परजिल्ह्यातून वा परराज्यातून येणार्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई लवकरच केली जाणार आहे.
- आगामी काही महिने निवडणुकींच आहेत.
या काळात गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता गृहित धरून आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह परजिल्ह्यातून वा परराज्यातून येणार्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई लवकरच केली जाणार आहे. पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांची माहिती संकलित करून या गुन्हेगारांना ‘वेळीच’ वेसन घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
यासाठी पोलीस ठाणेनिहाय सक्षम पोलिस अधिकारी नेमणुकीचीही सूचना करण्यात आली आहे. पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता येत्या काही दिवसात जारी होण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच बैठक पार पडली.
यात आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. तसेच, या गुन्हेगारांवर योग्य वेळी व प्रभावी कारवाई होण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पोलीस अधिकार्याची नेमणूक करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
या अधिकार्याने पोलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांची पडताळणी करून, शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध, विधीसंघर्षित बालक, गुन्ह्यांचे रेकॉर्ड नाही परंतु गुन्हेगारांना सहकार्य करणारे, समाजविघातक गुंडप्रवृत्तीचे गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे, अवैध व्यवसाय करणार्या गुन्हेगारांवर सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यानुसार या गुन्हेगारांची हद्दपारी, एमपीडीए, मोक्का यानुसार प्रस्ताव करून त्यानुसार कारवाई व त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
- अशी होणार कारवाई
- – दोन वा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
- – हद्दपारी कारवाईनंतरही वर्तनात सुधारण न झालेल्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई
- – संघटितरित्या गुन्हेगारी करणारे, तसेच गेल्या दहा वर्षात दोन दोषारोपपत्र दाखल असलेल्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये प्रस्ताव सादर करून कारवाई
- – रेकॉर्डवरील गुन्हेगार परंतु त्याच्या व्यवसायात व्यस्त असला तरीही त्याच्या हालचालीवर वॉच ठेवणे
- – गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्यांवर हद्दपारीची कारवाई करणे
- – हद्दपार केलेल्या गुन्हेगारांना सतत चेक करणे, आढळून आल्यास गुन्हा दाखल करणे
विधीसंघर्षितांसाठी सकारात्मक प्रयत्न
पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन करून त्यांच्या वृत्तीत सुधारणा व्हावी यासाठी विशेष सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. बाल न्याय मंडळ, एनजीओ (सेवाभावी संस्था), समुपदेशक यांच्या मदतीने विधीसंघर्षित बालकांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांचे पूर्नवसनासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.
“पोलिस ठाण्यांमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे, त्यांचा तपास यामुळे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकडे दूर्लक्ष होण्याची शक्यता असते. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येतील. त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे. आयुक्तालय हद्दीत झिरो टॉलरन्ससाठी आयुक्तांची संकल्पना उपयुक्तच ठरणार आहे.” – डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त, शहर गुन्हेशाखा.