नाशिकमध्ये मिळकतीच्या वादातून पाच लाखाची खंडणी; सखाराम साळवेला अटक !

फोनवरून धमक्यांचा पाऊस, धुव्रनगरमध्ये भीतीचं सावट!

लाल दिवा-नाशिक,दि.१३ – शहरातील धुव्रनगर भागातील मिळकतीच्या वादातून एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सखाराम वसंत साळवे (वय ४१, रा. राजवाडा, आनंदवल्ली, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. भास्कर शेषराव शिंदे (वय ४२, रा. एकदंत हाइट्स, धुव्रनगर, नाशिक) हे धुव्रनगर भागातील एका मिळकतीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास आरोपी सखाराम साळवे याने श्री. शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवरून (क्रमांक – ९६०४९९९०९९) संपर्क साधला. 

साळवे याने यापूर्वी देखील सदर मिळकतीच्या कारणास्तव श्री. शिंदे यांना धमकावून ५० हजार रुपये खंडणी वसूल केल्याचे तपासात उघड झाले आहे. यावेळी त्याने पुन्हा एकदा श्री. शिंदे यांचा मिळकतीशी काहीही संबंध नसतानाही पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. 

श्री. शिंदे यांनी साळवेची खंडणी देण्यास नकार दिला असता, साळवे भडकला आणि त्याने “पैसे दिले नाही तर तुझे तंगडे तोडीन,” अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. श्री. शिंदे यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली असता “तु आणि तुझा मालक प्रापर्टीवर कसा येतो ते बघून घेतो,” असे म्हणत साळवेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी श्री. शिंदे यांनी गंगापुर पोलीस ठाण्यात दिनांक १२ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३०८ (५) अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करत आरोपी सखाराम साळवे याला अटक केली. सदर कारवाई ही सपोनि गंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!