नाशिकमधील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केंद्र उघडकीस; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

  • आरोग्य विभागाची तक्रार; पोलिसांकडून कारवाई

लाल दिवा-नाशिक,दि.११ : महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये गेल्या १५ वर्षांपासून परवाना नूतनीकरण न करता अवैधरित्या गर्भपात केंद्र चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर.एन. पंड्या यांच्याविरुद्ध गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी जगराम चव्हाण यांनी पोलिसांना फिर्याद दिली होती की, पंड्या हॉस्पिटलमध्ये कायदेशीर परवानग्यांशिवाय गर्भपात करण्यात येत आहेत. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे मोठ्या प्रमाणात गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी औषधे, इंजेक्शन आणि बनावट कागदपत्रे आढळून आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पंड्या हे रुग्णांची नोंदवही ठेवत नव्हते आणि जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमांचे पालन करत नव्हते. तपासादरम्यान त्यांच्याकडून Misoprostol, Ketamine आणि इतर प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या प्रसुतींच्या नोंदी असलेल्या काही वही देखील जप्त करण्यात आल्या आहेत. 

या प्रकरणी भादंवि कलम 420, 465, 468 सह महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट 1948 चे कलम 3 आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 चे कलम 5, 6, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गर्भपात सदृश्य गंभीर बाबींमध्ये कायदेशीर बाबींकडे डोळेझाक करणाऱ्या अशा हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!