श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे मनपातर्फे स्वागत, वारकऱ्यांना आरोग्य सेवा …!
लाल दिवा : नाशिक महानगरपालिकेतर्फे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. पंचायत समिती कार्यालय येथे मा. आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पंचायत समिती कार्यालयाचे प्रांगण वारकऱ्यांनी फुलून गेले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीतर्फे राधाकृष्ण गमे, भाग्यश्री बानायत यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात श्री गमे यांनी यापुढे संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा स्वागतासाठी मनपाकडून तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, माजी आमदार बाळासाहेब सानप, श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्रंबकेश्वर अध्यक्ष निलेश गाढवे-पाटील, सचिव सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, महंत भक्तीचरणदासजी, हभप भाऊसो गंभीरे उपस्थित होते.
प्रशासनाकडून पालखीचे स्वागत झाल्यानंतर पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमोरही मनपातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. येथे मंडप उभारण्यात आला होता. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर दिंडी मालक हभप मोहन बेलापूरकर, दिंडी चालक बाळकृष्ण डावरे, निवृत्ती महाराज पालखी सोहळा स्वागत समितीचे कार्याध्यक्ष नरहरी उगलमुगले, समितीचे सल्लागार मोहनराव जाधव, राहुलजी बर्वे आदींना गुलाब पुष्प देऊन श्री वंजारी यांनी स्वागत केले. यावेळी मनपाच्या पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालयातील पथकाने वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली. पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. त्यानंतर रामकृष्णहरी, माऊली-माऊली असा जयघोष करीत पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी उपअभियंता नितीन राजपूत, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, नितीन गंभीरे, सुभाष बहिरम, अरुण मोरे, विक्रांत गोंगे, प्रतिभा चौधरी, जयवंती चव्हाण, डॉ. अक्षय पाटील, सचिन डोंगरे, विरसिंग कामे, सागर पीठे आदी मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इच्छामणी केटरर्स गाढवे बंधू यांच्याकडून वारकऱ्यांना अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.