नाशिक पूर्वमधील मनसे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ
मनसे उमेदवारावर दरोड्याचा गुन्हा दाखल! निवडणूक खर्चाच्या वादातून ९.५९ लाखांची लूट?
लाल दिवा-नाशिक,दि.१०:- आडगाव (प्रतिनिधी) – आडगाव शहरातील रो नंबर एक, महालक्ष्मी नगर येथे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ९ लाख ५९ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार असलेले प्रसाद दत्तात्रय सानप यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निवडणूक खर्चाच्या वादातून घडल्याचा संशय पोलिसांना आहे.
पीडित योगेश नाना पाटील (वय २८, व्यवसाय लोन एजन्सी) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बुधवारी रात्री १० वाजता घरी असताना सानप, उमाकांत एगडे, नितीन घुगे आणि संकेत मोहिते हे त्यांच्या घरी आले. सानप यांना पाटील हे गोल्ड क्लब येथील शिवनेरी विश्रामगृहात निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्यासाठी गेले नसल्याचा राग होता. याच रागातून त्यांनी पाटील यांना घरात शिवीगाळ केली आणि ८ लाख ८४ हजार रुपये रोख (५०० रुपयांच्या १७६८ नोटा) आणि ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (जुने आणि वापरलेले) जबरदस्तीने लुटून नेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२४ अन्वये भादंवि कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउनि मयूर तेजकुमार निकम हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची परवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली. खैरनार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बोर्डे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
मनसे उमेदवारावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, निवडणूक खर्च आणि या घटनेचा नेमका संबंध काय आहे, आरोपींनी लूट केलेली रक्कम ही निवडणुकीच्या काळ्या पैशांशी निगडीत आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध पूर्वी कोणतेही गुन्हे दाखल आहेत का याचीही चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
- प्रतिक्रिया
प्रसाद दत्तात्रय सानप: “वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. एका मंत्राला हाताशी धरून विरोधकांनी माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. धनशक्तीपुढे जनशक्तीला चिरडण्याचा हा प्रकार आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. हा सर्व बेबनाव असून आज सायंकाळी मी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार आहे
.”