आचारसंहितेच्या सावलीत ‘आरोग्य’ विभागाची ‘गडबड’!
घाईगर्दीने भरती; पात्र उमेदवारांवर अन्याय?; चव्हाण संशयाच्या भोवऱ्यात!
लाल दिवा-नाशिक,दि.१५ :- (प्रतिनिधी) नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील औषधनिर्माणशास्त्र विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवरून वादळ उठले आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच ‘घाईगर्दी’ने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्च पात्रतेच्या उमेदवारांना डावलून कमी पात्रतेच्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचा आरोप होत असून, आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील औषधनिर्माणशास्त्र विभागात रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच निकाल जाहीर करण्यात आला. हा निकालही आचारसंहीता दुपारी साडे तीन वाजता जाहिर झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रवेशद्वारावर लावण्यात आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
- पात्र उमेदवारांना डावलले?
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे उच्च पात्रतेच्या उमेदवारांना डावलून कमी पात्रतेच्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचा आरोप आहे. एम. फार्म झालेल्या उमेदवारांना नकार देऊन बी. फार्म झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- आचारसंहितेचे भंग?
ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच पूर्ण करण्यात आल्याने प्रशासनावर ‘काहीतरी लपवण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप होत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची भरती करता येत नाही, हे लक्षात घेता प्रशासनाने ‘घाईगर्दी’ का केली, असा सवाल उपस्थित होत आहे.
- चौकशीची मागणी
भरती प्रक्रियेतील ‘गडबडी’ आणि ‘अस्पष्टता’ पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उच्च पात्रतेच्या उमेदवारांना डावलून कमी पात्रतेच्या उमेदवारांना संधी कशी देण्यात आली, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
- छावा क्रांती सेनेचे निवेदन
या मनपा भरतीत पात्रता धारक उमेदवार व कोणावर अन्याय होणार नाही यासाठी छावा क्रांती युवा सेनेचे वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे . आयुक्त यांनी चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी दिला आहे .
तसेच पात्र उमेदवार यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी वंचित आघाडीच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष डॉ अविनाश शिंदे यांनी दिला आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष डॉ शिंदे यांनी दिला आहे .
निवेदन देण्यात येणार