शांततेचा भंग करत वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थ डे बॉय ला पोलिसांकडून चोप
लाल दिवा : नाशिक रोड परिसरातील खर्जुल मळा, सिन्नर फाटा या ठिकाणी शिवाजी पांडुरंग गायधनी या रुग्णवाहिका चालकाचा वाढदिवस अशाच काही पद्धतीने त्याचा भाऊ व त्याचे सहकारी साजरा करत होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा केला जात होता त्याचप्रमाणे परिसरातील शांतता भंग होईल याची कुठलीही काळजी न घेता मोठमोठ्याने आरडाओरड केली जात होते, याबाबत नाशिक रोड पोलिसांना माहिती कळाली असता त्यांनी सदर ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाठवत या गोष्टीची शहानिशा केली असता सदर ठिकाणी शिवाजी पांडुरंग गायधनी, शेखर पांडुरंग गायधनी (दोघे रा- राधा मोहन रो हाऊस, खजूर मळा, सिन्नर फाटा, नाशिक रोड), आकाश रवींद्र जारस रा. भारती कॉम्प्लेक्स शेजारी, सुभाष रोड, भारत प्रसाद सालकर रा. गोसावी वाडी, नाशिकरोड, हे आढळून आले चौघांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याने हॅप्पी बर्थडे हा सॅड बर्थडे मध्ये रूपांतरित झाला व बर्थडे बॉयसह पार्टीला आलेल्या सहकार्यांना नाशिकरोड पोलिसांकडून गिफ्ट रुपी चांगलाच चोप देण्यात आला. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्मचारी सागर जाधव यांच्या तक्रारीवरून चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णवाहिका चालक अनेक वर्षांपासून पोलिसांसोबत काम करत आहे तसेच सर्वांना चांगलाच परिचित देखील आहे असे असतानाही चूक झाल्यास माफी मागायचे सोडून हुज्जत घालू लागल्याने देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निमित्ताने नाशिक शहर पोलिसांनी अशा पद्धतीने सार्वजनिक शांतता भंग करत रस्त्यावर वाढदिवस साजरा करू पाहणाऱ्यांना इशारा दिला आहे की यापुढे अशी कुठलीही गोष्ट आढळल्यास बर्थडे बॉय सह संबंधितांना नाशिक शहर पोलीस खास गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही.