पालकमंत्री दादाजी भूसेंच्या पाठपुराव्याने जिवरक्षकास स्कुबा डायव्हिंग सेट व कॉम्प्रेसर मशीन झाले उपलब्ध शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख सात हजाराचे साहित्य उपलब्ध…!
लाल दिवा -नाशिक ,दि.५ : जिल्ह्यातील सिन्नर येथील जिवरक्षक गोविंद तुपे यांनी आजतागायत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्यात वाहून गेलेले तसेच विहिरीत पडलेल्या अनेक व्यक्तींचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. कुठलेही साहित्य नसतांना त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचिविले मात्र त्यांना कुठलेही सुरक्षा कवच नव्हते याची दखल घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
स्कुबा डायव्हिंग सेट व कॉम्प्रेसर मशीन साठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाण्यात स्विमिंग करून प्राण वाचविण्यासाठी सुरक्षा कवच गरजेचे असल्याची मागणी तुपे यांनी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली याची दखल घेवून मंत्री भुसे यांनी शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख सात हजाराचे साहित्य उपलब्ध करून दिले.
तुपे यांनी गेल्या ३६ वर्षांच्या कालावधीत पूर, नदीपात्र, विहीर, धरण, डोहात बुडालेल्या तब्बल १,७३० व्यक्तींचे मृतदेह शोधण्याची अत्यंत साहसी आणि अवघड कामगिरी करणाऱ्या गोविंद लक्ष्मण तुपे (रा. बेलू, ता. सिन्नर) यांच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याने स्कुबा डायव्हिंग सेट व कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध करून दिले आहे.
गोविंद तुपे वयाच्या १६ व्या वर्षापासून पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे मृतदेह शोधून काढण्यात, बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्याचे कार्य निःस्वार्थपणे करीत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत नाशिकसह जारील जिल्ह्यात एकूण 1730 मृतदेह पाण्यातून शोधून काढण्याचे अत्यंत जटिल काम केले असून, १७ व्यक्तींचे प्राण देखील वाचविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींचे उत्तम जीवनरक्षा पदक २०१६ मध्ये गृहमंत्र्यांनी त्यांना प्रदान केले.
पाण्यातून मृतदेह शोधण्याची कामगिरी केल्याबद्दल गोविंद तुपे यांना विविध संस्थांकडून आजवर शेकडो प्रशस्तिपत्रे प्राप्त झाली असून मंत्री भुसे यांच्या पुढाकाराने सरकारकडून त्यांना स्कुबा डायव्हिंग सेट व कॉम्प्रेसर मशीन मिळाल्याने त्यांचे हे अवघड काम सोपे झाले आहे यामुळे तुपे यांनी मंत्री भुसे यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता ही व्यक्ती समाजोपयोगी कार्यान जिल्ह्यात वेगळा ठसा निर्माण करीत असून जिवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. या कार्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.