कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; शेतजमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत…!
लाल दिवा – नाशिक, दिनांक 12 सप्टेंबर 2023
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शासनास आपली शेतजमीन विक्रीसाठी इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-2005 पासून राबवण्यात येत आहे. जमिनीच्या दरातील वाढ लक्षात घेता, या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यासाठी जिरायत जमिनीकरतिा प्रति एकर रूपये 5 लाख तर बागयती जमिनीकरिता प्रति एकर रूपये 8 लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत 14 ऑगस्ट 2018 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे. या योजनेंतर्गत उपलब्ध होणारी जमीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्वावर 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेंतर्गत खरेदी करावयाची जमीन कसण्यास योग्य असावी. जमीन डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपाड नसावी.
विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांना विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला, नासर्डी पुल नाशिक कार्यालयात सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करून घेता येतील. या अर्जासोबत 7/12 उतारा, 8 अ उतारा व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडील मुल्यांकन पत्रक इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वरील पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2975800 यावर संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक श्री. नादंगावकर यांनी कळविले आहे.