राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथे ‘विश्वशांती बुद्ध विहार’ चे भव्य लोकार्पण !
उदगीरात “विश्वशांती बुद्ध विहार” उभारला
लाल दिवा-उदगीर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तळवेस परिसरात ‘विश्वशांती बुद्ध विहार’ उभारण्यात आला आहे. या भव्य आणि देखण्या विहाराचे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या ऐतिहासिक क्षणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू यांनी विधिवत कोनशिलेचे अनावरण करून आणि फीत कापून विहाराचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी विहारात प्रतिष्ठापित केलेल्या गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी बुद्ध वंदनेत सहभाग घेतला. राष्ट्रपती मुर्मूंनी उपस्थित बौद्ध भिक्कूंना चिवर दान केले. बौद्ध भिक्कूंनी राष्ट्रपतींना गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले.
कर्नाटकमधील कलबुर्गी येथील प्रसिद्ध बुद्ध विहाराची प्रतिकृती असलेला हा विहार एकूण एक हेक्टर १५ आर क्षेत्रात विस्तारला आहे. यात १२०० अनुयायांना एकत्रित बसण्याची सोय असलेले प्रशस्त ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना सांची स्तूपाच्या धर्तीवर असून, ती पाहण्यासारखी आहे.
विहाराच्या उभारणीमुळे या परिसरात पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.