गणेशोत्सवाच्या रंगात रंगणारं नाशिक, पण कायद्याच्या नजरेतून सुटणार नाही कोणी! मनाई आदेशाचे उल्लंघन भोवले अटक
बाप्पाच्या शहरात कायद्याचा डंका: मनाई आदेशाचे उल्लंघन, दोघे सलाखांच्या आत!
लाल दिवा -नाशिक,दि.८ – दहा दिवसांचा गणपती बाप्पाचा उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी नाशिककरांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही, दोघांनी हा मनाई आदेश धुडकावत पोलिसांना आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त (परिमंडल २) मोनिका राउत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच काही गुन्हेगारांना ०७ सप्टेंबर २०२४ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु, देवळाली गावातील अनिकेत रत्नाकर देवरे (१९) आणि पियुश बाळू शिंदे (२४) या दोघांनी या आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे धाडस केले.
दि. ०८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या पथकाने गस्त घालत असताना हे दोघे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. चौकशीअंती त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये आणि शंका आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.