गणेश विसर्जन, ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर : नाशिकमध्ये ४०० हून अधिक गुन्हेगार हद्दपार, ३००० पोलिस तैनात, ड्रोनद्वारे देखरेख
नाशिक सज्ज: गणेश विसर्जन, ईद-ए-मिलाद निमित्त कडेकोट बंदोबस्त
लाल दिवा-नाशिक, १५ :-(प्रतिनिधी) – अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने होणारे गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे दोन्ही सण येत्या गुरुवारी एकाच दिवशी येत असल्याने नाशिक शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ४०० हून अधिक गुन्हेगारांना शहराबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध थरांवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोनही सणांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कोणताही धोका पत्करला नाही.
शहरातील विविध भागांमध्ये ३००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे पथक (SRPF), होमगार्ड आणि दंगल नियंत्रण पथके यांचा समावेश आहे. तसेच, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रूट मार्च सुरू करण्यात आले आहेत.
शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्सवाच्या काळात गोंधळ घालू शकणाऱ्या ४०१ हिस्ट्रीशीटरना प्रतिबंधक कारवाईअंतर्गत शहराबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावर आणि इतर संवेदनशील ठिकाणी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे २४ तास लक्ष ठेवण्यात येणार असून शहरातील विविध भागांवर ड्रोन कॅमेरेद्वारेही हवाई देखरेख ठेवण्यात येणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना शांतता आणि सलोखा राखून दोन्ही सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये आणि शंकास्पद व्यक्ती किंवा घटना पाहिल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे..